गोंदिया, दि.9 : आमगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे मतदान केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनचे दुसरी सरमिसळ प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पार पडली. 66-आमगाव विधानसभा मतदार संघातील 311 मतदान केंद्राकरीता BU-373, CU-373, VVPAT-404 राखीव मतदानासह प्राप्त झाले. त्याअनुषंगाने 66-आमगाव विधानसभा मतदार संघाचे झालेल्या दुसरे सरमिसळ (Second Randomization) प्रक्रियेला निवडणूक निरीक्षक नितीन भदौरिया, निवडणूक निर्णय अधिकारी कविता गायकवाड यांची उपस्थिती होती. यासोबतच निवडणूकीत उभे असलेल्या विविध राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रक्रियेत BU (बॅलेट युनिट), CU (कंट्रोल युनिट), VVPAT (वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल) मशीनचे दुसरे सरमिसळ करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींना स्क्रीनवर ईव्हीएम मशीनचे सरमिसळ प्रात्यक्षिकरित्या करुन दाखविण्यात आले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रावर कुठली मशीन कोणत्या ठिकाणी जाणार हे रॅन्डम पध्दतीने ठरविण्यात येते. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होते. या प्रात्यक्षिकानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्ह असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.
निवडणूक निरीक्षक व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान यंत्राची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पार पाडण्यात आली. सदर प्रक्रियेदरम्यान निवडणूक खर्च निरीक्षक नागेंदर भुकीया तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देवरी, आमगाव व सालेकसा यांची उपस्थिती होती.