>जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपणाचे आयोजन
बुलढाणा, दि.9: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबईतील गेटवे ॲाफ इंडिया येथून करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेटप्रक्षेपण करण्यात आले असून या प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील, निवडणूक निरीक्षक स्मिता सभरवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी ‘मतदान शपथ’ घेतली.
२० नोव्हेंबर रोजी आवर्जून मतदान करा- जिल्हाधिकारी
या कार्यक्रमात स्वीप उपक्रमांतर्गत मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या ‘लोकशाहीचा उत्सव साजरा करुया, चला मतदानाचा संकल्प करुया’ या मतदार जनजागृती ध्वनीचित्रफित संदेशाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच लोकशाहीचा उत्सव असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करून आपला अधिकार बजवावा व कर्तव्य पार पाडावे. येत्या २० नोव्हेंबर रोजी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी यावेळी केले.