योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध-पालकमंत्री दत्तात्रय भरणे

0
21
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
वाशिम,दि.१ मे– जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास तसेच औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
       आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
      यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व अपर पोलीस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर यांच्यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     पालकमंत्री श्री. भरणे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन केले तसेच राज्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला.
     यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती दिली. ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, ‘लाडकी बहीण योजना’ व ‘सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ यांतून हजारो लाभार्थ्यांना मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी स्क्वॅश कोर्टसाठी 1 कोटी 97 लाख 99 हजारांची प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे त्यांनी जाहीर केले.
      पुढे बोलतांना पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध योजनांसाठी 369 कोटी 95 लाखांचा निधी खर्च करण्यात आला असून, 2025-26 मध्ये अधिक व्यापक विकासासाठी नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘जलतारा प्रकल्प’ व ‘चिया लागवड’ यासारख्या योजनांमुळे शेती क्षेत्राला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
     पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक, होमगार्ड पुरुष व महिला दल, पोलीस बँण्ड पथक, शिघ्र कृती दल, पोलीस श्वान पथक, पोलीस बॉम्ब शोधक पथक, पोलीस मोबाईल फॉरेन्सीक इनव्हेस्टीगेशन व्हॅन, पोलीस वॉटर कॅनॉन, शासकीय रुग्णालयाची अत्याधुनिक रुग्णवाहिका व नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
        पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे व पार्वतीबाई दगडू लहाने, वीरमाता मंदाताई गोरे, वीरपीता तानाजी गोरे व वीर पत्नी वैशाली गोरे,वीरपत्नी मीराबाई नागुलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
          यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे , मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे व यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या डॉक्टर अश्विनी धामणकर यांचेही विशेष अभिनंदन पालकमंत्री श्री. भरणे यांनी केले यांचाही अभिनंदन करण्यात आले.
      ‘मिशन द्रोणागिरी’ अंतर्गत वाशिमचा समावेश झाल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा अंधत्व व दृष्टिक क्षीणता नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत दात्याची व अवयव दात्यांचे नातेवाईकांचा सन्मान, किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांची व किडनीदात्यांचा तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कारही यावेळी पालकमंत्री श्री. भरणे यांच्याहस्ते करण्यात आला.
          कार्यक्रमाचे संचालन राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे प्रा. मोहन शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, नागरिकांची उपस्थिती होती.
*जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन*
*गोरगरिबांसाठी वेळेत वैद्यकीय मदतीची प्रक्रिया होणार अधिक गतिमान – पालकमंत्री*
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ या नविन उपक्रमाचे उद्घाटन आज पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले. या कक्षाच्या स्थापनेमुळे गरजू व गरिब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता, अर्जाची नोंदणी व पुढील कार्यवाही यासाठी एकच खिडकी पद्धतीने सेवा मिळणार आहे. त्यामुळे उपचारासाठी वेळेवर आर्थिक मदत मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होईल.
      यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, “वैद्यकीय कारणांमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही योजना त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. आता जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन झाल्याने मदतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान होईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.