वाशिम, दि.६ मे : आगामी मान्सून हंगामात संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज रहावे, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात आणि प्रत्येक विभागाने तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन पथके तयार ठेवावीत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी आज दि.६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.
जिल्ह्यात नद्यांच्या पुरामुळे धोक्यात येणाऱ्या गावांची ओळख पटवून त्या ठिकाणी आरोग्य, बचाव आणि अत्यावश्यक सेवा यांची पथके २४ तास सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महापुराच्या संभाव्य प्रभावाखाली येणाऱ्या गावांबाबत सविस्तर चर्चा झाली.
महावितरण विभागास वीज अटकाव यंत्रे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून मालेगाव तालुक्यातील मौजे डव्हा संस्थान येथे वीज अटकाव यंत्राची दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत नवीन शोध व बचाव साहित्याचे वाटप सर्व तालुक्यांना करण्यात येणार असून, ३० प्रकारचे साहित्य तसेच १० पोर्टेबल लाईट इन्व्हर्टर व इतर उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. “आपला मित्र” प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त साहित्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी मध्यम प्रकल्पांच्या जलाशय पातळीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी धरणात १०.७८%, मालेगाव तालुक्यातील सोनल धरणात १२.७१% आणि कारंजा तालुक्यातील अडाण धरणात ४४.३९% पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. वाशिम तालुक्यात पाणी पातळी कमी असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाणी चा वापर करावा असेही यावेळी सांगण्यात आले.
पावसाळ्यात रोगप्रसार रोखण्यासाठी नालेसफाई, धोकादायक इमारतींची तपासणी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन साहित्य सज्जता, नियंत्रण कक्ष स्थापन व झाडे तोडण्याचे निर्देश नगरपरिषद व नगरपंचायत यांना देण्यात आले. अतिवृष्टीसह धरणांवर बिनतारी संदेश यंत्रणा व सूचनाफलक लावणे, प्रकल्पांचे सर्वेक्षण आणि दुरुस्ती, पर्जन्यमान स्टोनची तपासणी याबाबत संबंधित विभागांना सूचित करण्यात आले.
आरोग्य यंत्रणेला रुग्णवाहिका सज्ज ठेवणे, औषध साठा राखणे, आरोग्य पथके तैनात ठेवणे तसेच जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विद्युत वितरण कंपनीला २४ तास नियंत्रण कक्ष चालू ठेवण्याबरोबरच वाकलेले पोल, झाडांच्या फांद्या कापणे आणि दुरुस्ती पथके सज्ज ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्यांची तपासणी करून प्रमाणपत्र सादर करण्याचे आणि धोकादायक झाडे हटवण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व तहसीलदारांना शोध आणि बचाव पथके तयार ठेवण्याबरोबरच संभाव्य बाधित व्यक्तींची माहिती अद्यावत ठेवण्याचे, तात्पुरते निवारे निश्चित करण्याचे व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले.
या बैठकीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीचे सादरीकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.