पावसाळ्यात वीज उपकरणांपासून सावधान! महावितरणचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
23

नागपूरदि. 12 मे : विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाळ्याचे वेध लागले आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच, नागरिकांनीही स्वतःच्या स्तरावर वीज उपकरणांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

घरात सुरक्षित राहा:

  • वीजेची उपकरणे हाताळताना आपले हात पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा. ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते.
  • विद्युत उपकरणांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्या. पाणी विद्युत सुवाहक असल्याने अपघात होण्याची शक्यता असते.
  • उपयोग नसताना विद्युत उपकरणांचे प्लग बोर्डातून काढून ठेवा. यामुळे अनावश्यक वीज वापर टाळता येतो आणि सुरक्षितताही राखली जाते.
  • घरातील अर्थिंगची नियमित तपासणी करा. व्यवस्थित अर्थिंग नसल्यास विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढतो.
  • वीज पुरवठ्यातील चढ-उतारांमुळे उपकरणे खराब होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास स्टॅबिलायझरचा वापर करा.
  • पावसाळ्यात ओलसर भिंतींना स्पर्श करणे टाळा. तसेच, वीजप्रवाह उतरण्याची शक्यता असलेली उपकरणे ओलसर भिंतींजवळ ठेवू नका.
  • ज्यांचे घर पत्र्याचे आहे, त्यांनी पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंगची तपासणी करून घ्यावी.
  • इन्व्हर्टर, युपीएस आणि बॅटरीसारख्या उपकरणांची वेळोवेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
  • विजा कडकडत असताना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी विद्युत उपकरणे वापरणे टाळा.

घराबाहेरची काळजी:

  • पावसाळ्याच्या दिवसांत वीजेचे खांब धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या खांबांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
  • वीज रोहित्र किंवा खांबाजवळ खड्डा असल्यास आणि त्यात पाणी साचले असल्यास त्यापासून दूर राहा.
  • घराजवळ वीज तारा लोंबकळत असल्यास त्याची माहिती तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांंना द्या. स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नका.
  • जर कुणाला विजेचा धक्का बसला, तर त्याला थेट हात लावू नका. लाकडी काठी किंवा इन्सुलेटेड वस्तूने त्याला अलग करा आणि त्वरित उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा.

महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यापूर्वी आपल्या परिसरातील वीज खांब, तारा, रोहित्र किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणात काही बिघाड आढळल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी त्वरित आपल्या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. वीज खांबांना स्पर्श करणे टाळा आणि पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंग व अर्थिंग तपासून संभाव्य धोका टाळा.

अनेकदा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास काही नागरिक त्वरित वीज सुरू करण्याच्या प्रयत्नात अकुशल वायरमनची मदत घेतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे, अधिकृत तंत्रज्ञांचीच मदत घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अडचण आल्यास संपर्क साधा:

वीजे संबंधित कोणत्याही समस्यांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 18002333435. 18002123435 आणि 1912 या टोल-फ्री क्रमांकावर 24 तास संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसोबतच वीज अपघात आणि वीज बिलांसंबंधी तक्रारी देखील नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे.