
गोंदियात बुध्द जयंती उत्साहात
जगमे बुद्ध का नाम है येही भारत की शान है घोषनेने गोंदिया नगरी दुमदुमली
गोंदिया ता. १६:- विश्व गुरु होण्यासाठी भारताला, तथागत बुद्धाच्या मार्गाशिवाय पर्याय नाही असा ठाम विश्वास बहुजन विचारवंत अजाबशास्त्री यांनी व्यक्त केला. गोंदियात डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित बुद्ध जयंती कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून ते संबोधित करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जयंती समितीचे अध्यक्ष अनन्त टेम्भूरकर हे होते. मंचावर शहरातील बौद्ध वकील मंडळी सत्कार्मुर्ती म्हणून उपस्थित होते.
श्री शास्त्री पुढे बोलताना म्हणाले की, तथागताच्या जन्मापूर्वी हिंसा, चोरी, खोटारडेपणा, दारूच्या व्यसनाधीन आणि वासनाधीन समाज व्यवस्थेची बजबजपुरी माजली होती, यामुळेच तथागताने पंचशील मार्ग अंगीकारला. बुद्ध कोण्या एका व्यक्तीचे नांव नाही तर जे आपल्या जीवनाप्रति जागृत आहेत तेच बुद्ध आहेत.असे सांगून शास्त्री म्हणाले की,प्रत्येक व्यक्तीचे अंतिम लक्ष्य हे सुख शांती मिळावी असंच असते, परंतु सिद्धार्थाने आपल्या जीवनात नरबळी, अश्वबळी, पशुबळी आणि गायीचा बळी देण्यात येत असल्याचे पाहिले त्यामुळे त्यांनी जगाला मैत्री,शांती आणि अहिंसेचा संदेश दिला.
दुःखाचे कारण अज्ञान आहे.असे सांगून शास्त्री म्हणाले की, तथागताने प्रदान केलेल्या पंचशीलेचा मार्ग हा एकमेव पर्याय आहे.कारण हेच जीवनाचे साधन आहे.
बुद्ध प्रिय राजा सम्राट अशोकांच्या कारकिर्दीत संपूर्ण भारत बौद्धमय होता त्यामुळे आम्ही सर्वचं भारतीय बौद्धांचे वंशज आहोत!ज्यांची सत्ता असते त्यांचा धर्म नांदतो.मौर्य अर्थात बौद्ध सम्राटांची 200 वर्षे सत्ता होती. त्यामुळे बौद्ध धम्म जगात पसरला.पुनःसच हा भारत बौद्धमय करण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नाही.शास्त्री पुढे म्हणाले की, मौर्य घराण्यातील सत्ता संपुष्टात आल्यानंतर वैदिक धर्म आला,800 वर्षे मोघलांची सत्ता होती. त्यामुळे त्यांचा धर्म वाढीस आला.
येथील जातीयवाद्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य,बंधुभाव आणि न्याय व्यवस्थेचा विरोध केला त्यांना ही व्यवस्था नको आहे.
दरम्यान बुध्दजयंती निमित्त शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जगमे बुद्ध का नाम हैं येही भारत की शान हैं!
आदि घोषवाक्यानी गोंदिया नगरी दुमदुमून गेली. संपूर्ण वातावरण बुध्दमय झाले होते. येथील भीमनगरच्या मैदानावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनंत टेम्भूरकर यांनी पंचशील झेंडा दाखवून ही रॅली प्रस्थान करण्यात आली.या रॅली मध्य मोठ्यासंख्येने कार, बाईक आणि रथांचा समावेश होता.या रथांवर सजलेले धार्मिक देखावे, यामध्ये सम्राट अशोक, अंगुलीमाल यांचे बुद्धांना शरण जाणे ,तथागत बुद्धांचे वडील राजा शुददोधन,आणि माता महामाया आदि विविध देखाव्यांचा समावेश होता. मिरवणुकीत सर्वांनी परिधान केलेले शुभ्र वस्त्र आणि पंचशील झेंडे यांचे आकर्षण ठरलं !डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या दिवसी (ता. 13) बहुजन मिसनरी गायक संविधान मनोहरे यांच्या संगीतमय मैफलने चांगलीच वाहवाही लुटली.
नाचण्यासोबत बां भीमाचे लिटरेचर वाचायला पाहिजे – मनुवाद्यांचे पोरं निळ्या रंगात नाचायला पाहिजे
या गीतांला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.दरम्यान जातीयवादी माथेफिरुला शिक्षा देण्यासाठी ज्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला त्या सर्व बौद्ध वकिलांचा तसेच युनियन पब्लिक सर्विस कमिसनच्या परीक्षेत गोंदियातील प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.