
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गहेलाटोला येथे गुरांचे तीन गोठे जळून खाक झाले. यावेळी आग विझवण्याच्या प्रयत्नात गोठ्यावरील टिनाचे पत्रे अंगावर पडल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, १६ मे रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. योगराज भुमकराव गौतम (वय ४०) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
सद्या उन्हाळ्याचे दिवस असताना आगीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास गहेलाटोला येथील योगराज गौतम, भोजराज गौतम, खेमराज गौतम यांच्या गुरांच्या गोठ्यांना अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात ठेवलेल्या तणसासह नागर, वखर आदी शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. यावेळी योगराज गौतम हे आग विझविण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर गोठ्यावरील तप्त टिनाचे पत्रे पडल्याने हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच माजी जिप सभापती विश्वजीत डोंगरे यांनी माजी तमूस अध्यक्ष डॉ. प्रेमसींग राठौर यांच्यासह घटनास्थळावर धाव घेत गोरेगाव नगर पंचायत येथील अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. दरम्यान, जखमी योगराज यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले. तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यावेळी माजी सरपंच नीलकंठ कटरे, तंमूस अध्यक्ष कोमेश टेंभरे, माजी ग्रापं सदस्य खेमराज भोंडे, राजेश पटले, यांनीही शेजारील विंधन विहीरीवरील मोटारपंपने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तलाठी व्ही. के. मौदलकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. या घटनेत तिन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.