जिल्ह्यातील दुसरा गरूड कमांडो निखिलचे स्वागत

0
70

गोरेगाव,दि.२१ : तालुक्यातील ग्राम गिधाडी या छोट्याशा गावातील निखिल विद्या रूपचंद ठाकरे याने अपार कष्ट आणि जिद्दीच्या बळावर भारतीय वायुदलाच्या गरूड कमांडो पदावर निवड होण्याचा मान पटकावला आहे. जिल्ह्यातील तो दुसरा गरूड कमांडो ठरला असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. यातूनच मंगळवारी (दि. २०) गावकऱ्यांनी निखिलचे गावात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले.
निखिल ठाकरे यांचे वडील सन २०१० मध्ये मरण पावल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. घरी कमावणारा कोणीच नव्हता. आई आणि लहान भावाची जबाबदारी सांभाळत त्याने कष्टाचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला पेपर वाटण्याचे काम, नंतर जेसीबी चालक म्हणून काम करत त्याने आपल्या स्वप्नांकडे वाटचाल सुरू ठेवली. भारतीय हवाई दलाच्या गरूड कमांडोसाठी घेतल्या जाणाऱ्या कठीण चाचण्या आणि शारीरिक प्रशिक्षण पूर्ण करत त्याने यश मिळविले. याआधी तिरोडा तालुक्यातून एकजण गरूड कमांडो बनला असून, जिल्ह्यातून निखिल दुसरा ठरला आहे.यामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, पं. स. सभापती चित्रलेखा चौधरीसह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे यश हे केवळ माझे नाही, तर माझ्या कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचेही आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेला आधार आणि प्रेरणेनेच मी आज या ठिकाणी पोहोचू शकलो.
– निखिल ठाकरे