
अमरावती : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
खुद्द हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्रॅक्टर चालवला, यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी आपल्या शौर्याने देदिप्यमान कामगिरी केली आहे. आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच महात्मा गांधी ते पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी २१ मे रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवावी यासाठी सर्व देश एकजूट झाला होता. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. आम्ही जय जवान, जय किसान हा नारा दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा आमचा प्रश्न आहे. त्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे मोडत असताना अचानक शस्त्रसंधीचा निर्णय घ्यावा लागला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आपले जवान शर्थीने लढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा कशी केली? भारत पाकिस्तानमध्ये अमेरिका मध्यस्थी करत आहे का? ट्रम्प यांच्या पुढे आपले सरकार झुकले आहे का, हे प्रश्न निर्माण झाले आहेत, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.