ग्रा.पं. दारू पिणार्‍यावर १ हजार, विक्रेत्यावर १० हजाराचा दंड ठोठावणार

0
22

देवरी : व्यसनाला आळा घालण्यासाठी तसेच दारू समाजातील तंटे, भांडणाचे कारण आहे, दारूमुळे अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. यावर उपाय म्हणून देवरी तालुक्यातील मगरडोह ग्रामपंचायतीने दारू पिणार्‍यावर 1 हजार तर विक्रेत्यावर 10 हजाराचा दंड ठोठावणार असल्याचा ठराव संमत केला आहे. गावात दारूबंदीबाबत मगरडोह येथील सांस्कृतिक सभागृहात सोमवार 19 मे रोजी ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी आणि महिला ग्रामसंघाची संयुक्त बैठक झाली.

बैठकीत सर्व संमतीने गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसंघाच्या महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करून शपथ घेण्यात आली. ठरावानुसार गावात जर कोणी दारू पिऊन आला आणि गोंधळ घातला तर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल.  कोणी दारू विकताना आढळला तर त्याच्याकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाईल. एवढेच नाही तर कोणी गावात दुसर्‍यांदा दारू विकताना आढळला तर त्याच्या कडून 50 हजार रुपये दंड वसूलला जाणार आहे.

कोणी दारू पिऊन गावात गोंधळ घालताना आढळल्यास संबंधित व्यक्तीला ग्रामपंचायत स्तरावरील सरकारी योजनांचा लाभ दिला जाणार नाही, शासकीय कामांसाठी, योजनांसाठी आवश्यक असलेले कागदपत्र, प्राणपत्र, दाखलेही दिले जाणार नसल्याचे बैठकीत सर्वसंमतीने ठरविण्यात आले.  बैठकीला सरपंच मालन कोरेटी, ग्रामसंघ पदाधिकारी कल्पना मेळे, सरिता उईके, जिजा भोयर, नंदकला गावड, शेवंता मेळे, पुष्पा उईके, नीता भोगारे, जसवंता हरहुडे, सरपंच सुनीता दाणे, भैसारे, राकेश भैसारे, गुणेष्वर बिसनकर, सीमा अचले, गीता डोंगरे, बिरसा ब्रिगेडचे मोतीराम तोफे, पुनेश भोयर, मनोहर भोगारे, सेवकराम कुरसुंगे, लोकेश उईके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.