शेतकरी आत्महत्येची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत-अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

0
15
शेतकरी आत्महत्या समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
वाशिम, दि. २3 मे – शेतकरी आत्महत्या ही जिल्ह्यासाठी गंभीर चिंता बनली असतानाच, अशा संकटग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्नशील आहे. वाशिम जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी प्रशासन सजग असून, त्यात निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यांनी शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेश देत प्रशासनाच्या संवेदनशील आणि कणखर भूमिकेचे उदाहरण घडवले आहे.
 जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथील राजे वाकाटक सभागृहात दि.२२ मे रोजी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे बोलत होते.
बैठकीत एकूण १२ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील ३, मालेगाव तालुक्यातील ३, मंगरूळपीर तालुक्यातील ३, रिसोड तालुक्यातील २ व कारंजा तालुक्यातील १ अशा प्रकरणांचा समावेश होता.
यावेळी श्री. घुगे यांनी शेतकरी आत्महत्येची १८ प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ अहवाल सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.या बैठकीस विविध संबंधित विभागांचे अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये गतीने निर्णय घेण्यासाठी आणि मदतीचा लाभ तातडीने पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.