
तिरोडा,दि.२४ः येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकिय आधारभूत धान खरेदी किंमत २३०० रूपये प्रति क्विंटल असतांना सुद्धा व आधार भुत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करु नये असे असतांना सुद्धा तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी वर्ग १६०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल धान खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, यावर तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नसुन उलट शेतकऱ्यांच्या विरोधात व्यापारी वर्गाना आधारभूत खरेदी किंमती पेक्षा कमी किंमतीत धान खरेदी करण्यास प्रोत्साहन करित असल्याचे आरोप करीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे निषेध करीत गोंदिया जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली 23 मे २०२५ ला तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले.त्यामध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोंदिया यांचे सुचनेप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकिय आधारभूत खरेदी किंमती पेक्षा कमी किंमतीत धान खरेदी करु नये व कमी किंमतीत धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची लायसन रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसे न केल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश असतानाही या कडे पुर्ण पणे दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनामध्ये मागणी करण्यात आली आहे, निवेदन देताना गोंदिया डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, काॅग्रेस कमीटी तिरोडा तालुकाध्यक्ष रमेश टेंभरे,लक्ष्मीनारायण दुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वाय टी कटरे , संजय जांभुळकर,प्रवीण चव्हाण,संजय खियानी शिवप्रसाद यादव, साबीर भाई शेख, गौरीशंकर कानेकर, राजकुमार शेंडे, रमण नागपुरे,कमलेश मलेवार, शामराव खोब्रागडे,बबलदास रामटेके, दीपक चव्हाण अशाप्रकारे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.