वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक वापरा;महावितरणचे आवाहन

0
21

 नागपूरदि. 24 मे2025: वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालविण्यापेक्षा वीजग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या 1912, 18002333435 व 18002123435 या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा व वीजबिलासंबंधिच्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणची यंत्रणा टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी 24 तास कार्यरत आहे. राज्यातील वीज ग्राहकांची संख्या तीन कोटींपेक्षा अधिक तर नागपूर परिमंडलाची 18 लाखांच्या घरात आहे. या सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी तसेच त्यांनी वापरलेल्या विजेचे अचूक देयक तयार करण्यासाठी महावितरण कायम प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. ग्राहकांच्या मीटरपर्यंत येणारी वीज हजारो किलोमीटरच्या जाळ्यातून येते. यामध्ये अनेक रस्ते अपघात, नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते. मात्र सद्यस्थितीत ग्राहक ऑनलाईन पेक्षा वैयक्तिक तक्रारींवर जादा भर देत असल्याने यंत्रणेचा वेळ खर्ची जात आहे.

वीजपुरवठा व विजेसंबंधिची तक्रार कोठे करावी ?

विजेचे जाळे सर्वदूर पसरलेले असले तरी महावितरणची सेवा मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राने सर्वांना सहज व 24 तास उपलब्ध आहे. महावितरणची सेवा केंद्रे शेकडो कर्मचाऱ्यांसह 24 तास कार्यरत आहेत. त्यासाठी ग्राहकांनी वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रार तत्काळ नोंदविण्याकरिता 1912, 18002333435 व 18002123435 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे क्रमांक संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. तक्रार नोंदविताना ग्राहकांनी त्यांचा 12 अंकी ग्राहक क्रमांक नोंदविल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. ती तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. तसेच तक्रारीची नोंद ऑनलाईन प्रणालीत झाल्यामुळे मा. वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकांनुसार वेळेत सोडवणे बंधनकारक बनते.

फोनवर केलेल्या तक्रारींची नोंद नसते

ज्याप्रमाणे टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींची नोंद ऑनलाईन प्रणालीत होते. त्याउलट एखाद्या वीज कर्मचाऱ्याला फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद होत नाही. कारण ज्यावेळी एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित होतो, तेंव्हा एकाच वेळी त्याला अनेक फोन येतात. प्रत्येक जण त्याचे नाव, पत्ता सांगण्यात वेळ घालवतो. तसेच फोन चालू असल्यामुळे त्याला फॉल्ट शोधता येत नाही. खांबावर किंवा वीज वाहिनीवर काम करताना घेतलेला कॉल त्याचा जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे वैयक्तिक फोन करणे टाळावे.

SMS व मिस कॉलद्वारेही नोंदवा तक्रार

वीजग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या क्रमांकावरुन 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा किंवा नोंदणीकृत मोबाईलवरुन “NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक>” हा संदेश टाईप करुन 9930399303 या क्रमांकावर पाठवल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते व तसा संदेश ग्राहकाला मिळतो.

महावितरण संकेतस्थळ व मोबाईल अॅपचा वापर

महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत, त्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे अॅप प्लेस्टोअर किंवा अॅपस्टोअरहून डाऊनलोड करावे. यामध्ये एकापेक्षा जास्त वीज जोडण्या एकदाच नोंदणी करुन हाताळता येतात. याशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही ग्राहक सेवा स्वतंत्रपणे दिल्या आहेत. ग्राहकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येतो