वैष्णवी हगवणे प्रकरण:- हुंडाबळी प्रकरणात कायद्यात बदल हवा-सामाजिक कार्यकर्ता-देवेश्वरी तु. रहांगडाले

0
45

गोंदिया,दि.२५ः पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा हुंडा आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर प्रश्न ऐरणीवर आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता सौ.देवेश्वरी रहांगडाले यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले की, “हुंडा घेणारे, हुंडा देणारे आणि सगळ्या या व्यवस्थेला मूकपणे तडजोड देणारे आहोत. त्यातून होणारे असे मृत्यू, अनेक छळ – कायदे महिलांसाठी उपलब्ध असूनही त्याचा उपयोग काय?” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूमागे फक्त एका मुलीचा शोक नसून, तो एक संपूर्ण व्यवस्थेचा अपयश असल्याचे सौ.देवेश्वरी रहांगडाले यांनी नमूद केले.“कितीतरी वैष्णवी अजूनही अडकलेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल, त्यांचा विश्वास जिंकावा लागेल आणि जमेल ती मदत करावी लागेल,” असे त्या म्हणाल्या.

राज्य महिला आयोग, पोलीस प्रशासन व सरकारी यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. “फार आशादायक चित्र दिसत नाही ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे! पण लढत राहावं लागेल,”अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.