विकास कामांसाठी लागणाऱ्या निधींचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
12
परभणी, दि. २५- जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या निधींचे प्रस्ताव वेळेत सादर करावे. निधी प्रस्ताव पाठविणे प्रलंबित राहू नये, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्रीमती मिसाळ यांनी आज नगरविकास, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, परिवहन, वैद्यकीय शिक्षण विभागांच्या विविध योजना व त्यांच्या अंमलबजावणी स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदींसह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागाशी संबंधित योजनांच्या सद्यस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण केले.
श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाच्या विविध योजना आहेत. प्रत्येक विभागाने जिल्ह्याच्या विकासासाठी कोण-कोणत्या योजनेमधून निधी प्राप्त होईल, याबाबत माहिती असली पाहिजे. वेळेत प्रस्ताव पाठविल्यानंतर संबंधित योजनेमधून निधी मंजूर होतो. या निधीचा उपयोग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करावा.
सुरवातीला परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत मान्सून पूर्व नालेसफाईची कामाबाबत सद्यस्थिती आणि संसर्गजन्य आजाराबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना, शहराच्या पिण्याच्या पाणी पुरवठा बाबत माहिती मनपा आयुक्त यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली. जिल्हा नियोजन कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक योजनाबाबत अल्पसंख्याक समाजातील सर्व घटकाला योग्य न्याय देण्याच्या सूचना त्यांनी अल्पसंख्याक विभागाला दिल्या. अल्पसंख्याक वसतीगृहात प्रवेशक्षमता वाढविण्यासाठी प्रचार-प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ट्रेनिंग सेंटर आणि टेस्टींग सेंटरसाठी जागा निश्चिती करुन त्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे निर्देश एसटी महामंडळाला त्यांनी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत वसतीगृह, प्रवेश क्षमता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित बांधकामबाबतची माहिती यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता श्री. भिसे यांनी दिली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत केलेल्या कार्याचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांनी खुप चांगल्या प्रकारे काम केले आहे. येणाऱ्या 150 दिवसांच्या कार्यक्रमध्येही आपण निश्चितच चांगले काम कराल अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यातील विकास कामांच्याबाबतीत ज्या काही अडचणी असतील त्याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करुन त्या निश्चितपणे सोडविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.