
परभणी : परभणीतील पाथरी येथील शहराजवळील आष्टी फाटा येथील हॉटेल कृष्णा आणि नायरा पेट्रोल पंपजवळ सोमवार 9 जून रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाथरीहून माजलगावकडे जात असलेला ट्रक क्र. एनएल-01-एसी-4255 नायरा पेट्रोल पंपाजवळ पोहोचला असताना विरुद्ध दिशेने आलेल्या पिकअप क्र.एमएच-14-एलएल-5708 ने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर, पिकअप पलटी झाला. त्याचवेळी पाठीमागून आलेली दुचाकी क्र. एमएच-23-बीबी-8143 अपघातग्रस्त वाहनांवर आदळली.या अपघातात दुचाकीवरील दोघे आणि पिकअप चालक गंभीर जखमी झाले असून ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे (Pathri Police Station) पोलिस निरीक्षक महेश लांडगे (Police Inspector Mahesh Landge) यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयाला (Rural Hospital) माहिती देत घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवले आहे. अपघातानंतर, वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी (Police) अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.