
गोंदिया,दि.२० : आमगाव-देवरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अंजोरा सहवनक्षेत्रातील रामपूर गावाजवळ आज शुक्रवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एक पट्टेदार वाघ मुक्तसंचार करतांना आढळला. पाच ते दहा मिनिटे या मार्गावर या वाघाचा मुक्त वावर होता.त्यामुळे या मार्गावरुन ये-जा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर या वाघाने रस्त्यालगत असलेल्या शेताकडे धाव घेत नागरिकांच्या भितीने नालीत जाऊन आपले बस्तान मांडले.गावकऱ्यांची लगेच याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे रेस्कु पथक घटनास्थळी दाखल झाले.त्या वाघाला जेरबंद करण्यात आले असून नवेगावबांध येथे हलवून जंगलात सोडण्यात आले आहे.
साकरीटाेला-अंजोरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असल्याची माहिती आहे.या वाघाने तीन ते चार जनावरांची शिकार सुध्दा केली. यामुळे या परिसरातील पशुपालक आणि गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते.सदर वाघाची तपासणी करण्यात आले असता वाघ सृदृढ असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांच्या निर्देशानुसार जंंगलात मुक्तसंचाराकरीत सोडण्यात आले.यावेळी मानद वन्यजीव सावन बहेकार,पशुधन विकास अधिकारी डाॅ.शैलेंद्र पटले,डाॅ.अंजिक्य उरकुडे,देवरी व आमगाव येथील वनपरिक्षेत्रअधिकारी उपस्थित होते.