
वृत्तसंस्था
नवी दिल्ली- पोलादी पडद्याचे युग काळाआड गेले आहे. आता सरकारने जनतेला योग्य माहिती जलद गतीने उपलब्ध करून देण्याची गरज असल्याने सोशल मीडियाचा आक्रमकपणे वापर करा, असा सल्ला केंद्रातील माहिती व नभोवाणी खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला.
संवाद साधण्यासाठी फेसबुकचा प्रभावी वापर कसा करावा, यासंदर्भात पत्रसूचना कार्यालयातील (पीआयबी) अधिकाऱ्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन राठोड यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, “”आपण खुले होण्याची गरज आहे. अजूनही सरकार पोलादी पडद्याच्या आधार घेत आहे. पण आता काळ बदलत असल्याने प्रथम आपल्या विचारसरणीत बदल करायला हवा. निर्णय घेणाऱ्यांपासून तिचा प्रसार करणाऱ्यांपर्यंत माहिती पोचविण्याची प्रक्रिया जलद गतीने होणे आवश्यक आहे. यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण दूरचित्रवाणीवरील चर्चा असे याचे स्वरूप नसून सार्वजनिक मतांचे प्रतिबिंब त्यात दिसत असते.