ऑटोतून उडी घेऊन तरुणी पोहोचली पोलिस ठाण्यात,ऑटोचालक ताब्यात

0
199

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनअनेक किशोरवयीन मुली शासकीय कामासाठी गोंदियात येतात. मात्र, त्यांच्या प्रवासाचा अनुभव सुरक्षित असेलच असे नाही. असाच धोकादायक प्रसंग तरुणीसोबत गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजेदरम्यान रावणवाडी येथे आला. ऑटोत एकटीच असताना तिला चालकाने गावाकडे न नेता विरुद्ध दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रसंगावधान राखून तरुणीने ऑटोतून उडी घेतली व थेट पोलिस ठाणे गाठले. तालुक्यातील ग्राम परसवाडा येथील २१ वर्षीय तरुणी शासकीय कामानिमित्त गोंदिया येथे आली होती.काम आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी ती गोंदिया शहरातून रावणवाडी मार्गावर जाणाऱ्या एका ऑटोत बसली. सुरुवातीला इतर प्रवासीही ऑटोमध्ये होते, मात्र रावणवाडी स्थानकाजवळ सर्व प्रवासी उतरल्यावर ती एकटीच उरली. यावेळी ऑटोचालकाने डिझेल भरण्याच्या निमित्ताने वाहन पेट्रोल पंपाकडे वळविले. डिझेल भरल्यानंतर ऑटो अपेक्षित मार्गाने न नेता विरुद्ध दिशेने नेल्याने याची कल्पना येताच तरुणीने ऑटोचालकाला प्रश्न विचारला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने प्रसंगावधान राखत धावत्या ऑटोतून उडी घेतली आणि थेट रावणवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक वैभव पवार यांनी कोचेवाही येथील २८ वर्षीय ऑटो चालकावर भारतीय न्याय संहिता कलम ७५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित ऑटोचालकाला ताब्यात घेतले आहे.