
• शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे
• कृषी विभागाच्या योजनांची आढावा बैठक संपन्न
परभणी, दि. 22 : शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत प्राधान्याने पोहोचवून त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.
कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अतिरिक्त मुख्य अधिकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डि.एस. चव्हाण यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक, पशुसंवर्धन, रेशीम, दुग्ध, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जलसंधारण, मृद सर्वेक्षण, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, परभणी हा कृषी प्रधान जिल्हा आहे. शेती हेच बहुतांशजणांचे उपजिविकेचे साधन आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी सुखी व संपन्न होण्यासाठी शासनाच्या योजनांसह नाविण्यपूर्ण उपक्रम तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत दक्षतेने पोहोचविणे आवश्यक आहे. ग्रामसभा किंवा सरपंच व त्यांच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये स्वत: ग्रामसेवकाने योजनांची माहिती प्राधान्याने द्यावी. नवीन योजना किंवा नाविण्यपूर्ण उपक्रम सांगावेत. शाळांमध्येही योजनांची माहिती द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकापर्यंत माहिती जाण्यास मदत होईल. पिक विमा, नुकसान भरपाई, पिक सर्वेक्षण यासह शेतीशी संबंधीत शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या व प्रलंबित तक्रारींचा निपटारा तातडीने करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांची पिक विमा योजनेची रक्कम देणे प्रलंबित असेल तर त्या शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन त्यांना प्राधान्याने रक्कम अदा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी कृषीशी संबंधित जिल्ह्याची भौगोलिक माहिती, तालुकानिहाय पर्जन्यमान, खरीप पेरणी, प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप हंगाम), पिक विमा योजनेबाबत तक्रारी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, स्वयंचलित हवामान केंद्र, विस्तार विषयक विविध योजने अंतर्गत मंजूर कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, कृषी पुरस्कार, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास, कृषी समृध्दी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, जलयुक्त शिवार, आदर्श गाव योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आदींचा सविस्तर आढावा घेतला.





