
परभणी, दि. 23 – सद्यस्थितीत जायकवाडी, माजलगाव या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा पातळी 396.47 मी. इतकी आहे तर धोका पातळी 398.7 मी. इतकी आहे. सद्यस्थितीत पाणी पातळी वाढल्याने नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे व सुरक्षास्थळी राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
तसेच पाथरी उपविभागातील पूर परिस्थितीबाबत छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय सेनादलाची तुकडी पाचारण करण्यात आली आहे. सदरील तुकडीचे नेतृत्व मेजर कमाल हे करत आहेत. ही तुकडी जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त खबरदारी म्हणून एनडीआरएफचे पथक उपलब्ध करुन देण्यासाठी शासनास कळविण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरिता दिनांक 23 व 25 सप्टेंबर 2025 या दोन दिवसांकरिता यलो अलर्ट असा इशारा देण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. परभणी जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना हे धरणे, ढालेगाव, तारुगव्हान, मुदगल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न पातळी व मध्यम प्रकल्प इत्यादी पुर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे सदर धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव इत्यादीमधून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पुर्णा व दुधना आणि सदर नद्यांच्या उपनद्या, ओढे नाले इत्यादी तुडुंब भरून वाहत आहेत नागरिकांनी पर्यटन स्थळे नदी काठ व रस्त्यावरून पाणी वाहत असेल अशा ठिकाणाहून धोकादायकरित्या प्रवास करणे टाळावे, स्थानिक पोलिस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता निश्चित करणे इत्यादी बाबत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
एकूण जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, मान्सून कालावधीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 02452-226400, टोल फ्री क्रमांक 1077 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पवन खांडके, मो. 9975013726 / 7020825668 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले आहे.





