31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र नवे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतमालाचे मूल्यवर्धन करावे – मंत्री जयकुमार रावल

नवे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतमालाचे मूल्यवर्धन करावे – मंत्री जयकुमार रावल

0
39

वर्ल्ड फुड इंडिया येथे महाराष्ट्र दानाचे उद्घाटन जयकुमार रावल यांच्या हस्ते

नवी दिल्ली,26 : नवी दिल्ली येथे 25 ते 28 सप्टेंबरदरम्यान सुरू असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया 2025 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात महाराष्ट्र राज्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या दालनाचे उद्घाटन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज झाले.
या वेळी मंत्री रावल यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना जागतिक तंत्रज्ञान आत्मसात करून अन्नप्रक्रिया क्षेत्रात मूल्यवर्धन साधण्याचे आवाहन केले.

या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मोदी यांनी खाद्यप्रक्रिया क्षेत्रात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी असल्याचे सांगत पोषण, हेल्दी पॅकेज्ड फूड आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंगवर भर देण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र दालनात राज्यातील 28 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित विविध उत्पादने प्रदर्शित केली आहेत. यात मोदक, पुरणपोळी, द्राक्ष व कांदा प्रक्रिया, संत्री व मोसंबीवर आधारित उत्पादने, वाईन उत्पादन, मिलेट बिस्किटे, कुकीज, सुप आदी विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

मंत्री श्री रावल यांनी या लाभार्थ्यांना प्रोत्साहन देत ऑनलाईन मार्केटिंग, निर्यात प्रक्रिया आणि आधुनिक विपणन पद्धतींविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी व पणन विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देताना ते म्हणाले की, प्रदर्शनातून मिळणारे आधुनिक तंत्रज्ञान राज्यभर पोहोचविणे आणि शेतमाल प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मशिनरीची पाहणी करताना मंत्री रावल यांनी महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना संदेश दिला की, नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, आधुनिक यंत्रसामग्री वापरा आणि महाराष्ट्राला खाद्यप्रक्रिया उद्योगात जागतिक पातळीवर अग्रस्थानी आणावी असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

या दालनाला श्रीलंका, युगांडा, दुबई, साऊथ आफ्रिका आदी देशांतील गुंतवणूकदार व व्यापाऱ्यांनी भेट दिली. त्यांनी महाराष्ट्रातील आंबा प्रक्रिया, दाल वर्ग उत्पादने, डीहायड्रेट भाजीपाला व फळे या उत्पादनांच्या खरेदीसाठी व गुंतवणुकीसाठी प्राथमिक चर्चा केली.