35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासण्या

कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासण्या

0
32

blank

मुंबई,दि.१८- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अभियानांतर्गत 8 कोटी 66 लाख लोकसंख्या आणि 1 कोटी 73 लाख 25 हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून, 65 हजार 832 पथके आणि 13 हजार 166 पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज 20 घरे तर शहरी भागात 25 ते 30 घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असून, ते सलग 14 दिवस सर्वेक्षण करतील.
कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक नुकतीच आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. राजरत्न वाघमारे, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार, दूरदर्शन प्रतिनिधी डॉ. आलोक खोब्रागडे, आकाशवाणी मुंबईचे राजेश शेजवले, अलर्ट इंडियाचे वरिष्ठ प्रोग्रामर विन्सेंट के. ए., ‘अपाल’चे अध्यक्ष माया रणवरे, महाराष्ट्र कुष्ठ पीडित संघटनेच्या सदस्या मदिना शेख, तसेच जनसंपर्क अधिकारी विकास सावंत या बैठकीला उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना तसेच जिल्ह्याधिकारी व गावांच्या सरपंचांना पत्र लिहून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियानात जास्तीत जास्त कुष्ठरुग्णांचे निदान निश्चितीसाठी सर्व यंत्रणांना मार्गदर्शन करुन आपल्या प्रभावी नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी या अभियानाचा सखोल आढावा घेतला आणि सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत, प्रभावी आणि सर्व सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत सहज उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

blank