
गोंदिया,दि.२४ः तीन राज्यांच्या सीमा भागात सक्रिय असलेल्या महाराष्ट्र-मध्य माओवाद्यांच्या प्रदेश-छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीने शस्त्र सोडून सशस्त्र संघर्ष थांबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
यासाठी कमिटीने १५ फेब्रुवारी २०२६पर्यंतची मुदत सरकारकडे मागितली आहे. ‘एमएमसी’चा प्रवक्ता अनंत याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नावे हे पत्रक जारी केले आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती आणि इतर बड्या नेत्यांनी शस्त्र सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य असून महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड स्पेशल झोनल समितीचे समर्थन आहे.
आम्ही शस्त्र सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी झोनमधील सर्व सक्रिय माओवाद्यांसोबत चर्चा करणे आवश्यक आहे. त्यांच्याशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी आवश्यक तत्काळ स्वरुपाचे माध्यम आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा संदेश पोहचविण्यासाठी वेळ देण्यात यावी. तोवर फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत माओवादी संघटनेविरोधातील सर्व अभियान थांबविण्यात यावे, कुठलेही सशस्त्र अभियान एमएमसी झोनच्या माओवाद्यांविरोधात चालवू नये. आम्ही कुठलीही हिंसक कृती करणार नाही, २ डिसेंबरपासून सुरू होणारा पीएलजीए हा विशेष सप्ताह साजरा करणार नाही, असाही दावा पत्रकातून केला आहे. हा झोन माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याच्या नेतृत्वात तयार करण्यात आला होता.
बुलेटमधील माहितीनुसार, देशभरात १८७ पुरुष आणि ११७महिला माओवादी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. राज्य समितीचे १५ सदस्यांचाही यात प्रामुख्याने समावेश आहे. गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष भूपतीने तर छत्तीसगडमध्ये सतीश या दोघांनाही आत्मसमर्पण केले. या दोघांच्या नेतृत्वात २९९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सुरक्षा यंत्रणांना २०३ शस्त्र देऊन क्रांतिकारी चळवळीचे नुकसान केले आहे. माओवादी संघटनेला दोघांनीही अडचणीत आणले. दोघेही चुकीच्या पद्धतीने संघटनेच्या भूमिकेवरून दिशाभूल करीत संभ्रम वाढवित असून हे गद्दार असल्याचा आरोपही बुकलेटमधून करण्यात आला आहे.
११६ जवान शहीद
‘ऑपरेशन कगार’ मुळे माओवादी संघटनेसोबतच सुरक्षा दलांचेही मोठे नुकसान झाले असल्याचा दावा बुकलेटमधून करण्यात आला आहे. संपूर्ण दंडकारण्यासह बिहार, झारखंड आणि एमएमसी झोनमध्ये सुरक्षा दलाचे ११६ जवान शहीद तर २०८ जखमी झाले आहेत. कॉर्पेटिकरणाच्या विरुद्ध माओवादी संघटनेने रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली. मोबाइल टॉवर जाळून देशभरात ७२ हल्ले केले. ऑपरेशन कगारदरम्यान सुरक्षा दलाविरुद्ध हल्ले करण्यासाठी आयईडी स्फोटके पेरून ठेवली होती. सुरक्षा दलांशी मुकाबला करतानाच अम्ब्युश सक्रिय करीत पोलिस खबऱ्यांना ठार मारण्याच्या रणनीतीचा अवलंब केल्याचा दावाही माओवाद्यांनी केला आहे.
साडेआठ लाख जवान तैनात
‘ऑपरेशन कगार’ च्या नावावर माओवादप्रभावित भागात केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून तब्बल ८ लाख ५० हजार जवान तैनात केले आहेत. त्यांचा मुकाबला करीत हल्ले परतावून लावण्यात पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीला यश आल्याचा दावाही पत्रकातून करण्यात आला आहे. करेगुट्टाच्या पहाडावर अमेरिका, इस्रायलच्या सैन्य रणनीतीनुसार तांत्रिक पद्धतीने त्यांच्यासोबत भागीदारी करत राबविलेले अभियान माओवाद्यांनी उधळून लावल्याचा दावाही पत्रकातून करण्यात आला आहे.





