33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News 1 एप्रिल 2026 पासून बँकिंग जगात होणार धडाकेबाज बदल!

1 एप्रिल 2026 पासून बँकिंग जगात होणार धडाकेबाज बदल!

0
29

blank

भारतामध्ये बँकेत खाते असणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ५ डिसेंबरला निर्णयांसह जाहीर होणार असली, तरी त्याआधीच आरबीआयने काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. हे नियम थेट सर्वसामान्य ग्राहकांशी संबंधित असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२६ पासून हे सर्व नवे नियम लागू होणार असून बँकिंग क्षेत्रातील टियर-१ कॅपिटल, ग्रुप एक्सपोजर आणि इंट्रा-ग्रुप व्यवहार यामध्ये मोठे बदल केले गेले आहेत. परंतु सर्वात मोठा फायदा सामान्य ग्राहकांना म्हणजेच रोजच्या बँकिंग सेवांचा वापर करणाऱ्यांना होणार आहे. कारण आरबीआयने दोन मोठे बदल करत BSBD म्हणजेच ‘Basic Savings Bank Deposit’ खात्याशी संबंधित नियम अधिक सुलभ केले आहेत.

आरबीआयने काय केले बदल?

आजच्या काळात किमान बँक शिल्लक, बँकिंगचे वाढते शुल्क, डिजिटल पेमेंटवरील अडचणी यामुळे ग्राहक त्रस्त होते. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी BSBD खाते हे प्रामुख्याने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी किंवा लहान व्यवहार करणाऱ्यांसाठी तयार करण्यात आले होते, पण आता आरबीआयने हे खाते सर्वांसाठी खुलं केलं आहे. म्हणजे कोणताही ग्राहक शून्य शिल्लक ठेवून हे खाते सहज उघडू शकेल. या खात्यात आता किमान सरासरी बॅलन्स (MAB) ठेवण्याची अट राहणार नाही आणि कोणतेही लपलेले शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे बँकिंग सुलभ आणि स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्यांना हा निर्णय जणू एक सुखद धक्का ठरणार आहे. याशिवाय BSBD खातेदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्येही मोठ्या सुधारणा केल्या आहेत. आता खाते उघडणाऱ्यांना २५ चेकलीफ पूर्णपणे मोफत मिळतील, तसेच एटीएम आणि डेबिट कार्डसाठी कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही. पूर्वी अनेक बँकांमध्ये या कार्डसाठी वार्षिक शुल्क आकारले जात होते, ज्यामुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना दरवर्षी आर्थिक ताण बसत होता. डिजिटल व्यवहाराच्या बाबतीतही आरबीआयने मोठा बदल केला असून आता यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस आणि ऑनलाइन बँकिंग पूर्णपणे मोफत असेल. कारण डिजिटल व्यवहार हे ‘पैसे काढणे’ या श्रेणीत मोडत नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. रोखीच्या व्यवहारासाठीही आता मोठी सुविधा देण्यात आली आहे. BSBD खातेदारांना दर महिन्याला चार मोफत रोख व्यवहार करता येतील, ज्यात एटीएममधून पैसे काढणे, शाखेतून पैसे काढणे आणि निधी हस्तांतरण या तिन्ही गोष्टींचा समावेश असेल. चार व्यवहारांनंतर मात्र ग्राहकांना नेहमीचे शुल्क लागू होईल.

दुसरीकडे, बँकांच्या कर्ज वितरणाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी आरबीआयने Concentration Risk Management मध्येही मोठे बदल केले आहेत. यामुळे बँकांना कोणत्याही एका मोठ्या कर्जदाराला किंवा एखाद्या गटाला जास्त कर्ज देण्यावर मर्यादा येणार आहेत. हे नियम संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. सर्वसाधारण ग्राहकांच्या दृष्टीने पाहता BSBD खात्याशी संबंधित बदल हे मोठे आणि फायदेशीर आहेत. आता बँक खाते ठेवणे अधिक सोपे, स्वस्त आणि तणावरहित होणार आहे. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी तर हे नियम आणखी फायदेशीर आहेत कारण व्यवहारांवरचे सर्व शुल्क हटवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात बँकिंग क्षेत्रात मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांना आता नवीन गती मिळणार आहे.

blank