33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात दाखल

विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात दाखल

0
45

blank

 नागपूर-राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. कारण शेतात हल्ले, लहान मुलांच्या जीविताला धोका या सर्व घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा अनेक भागात बिबट्यांची मोठी संख्या असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर जिथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे, त्या नागपूरपरिसरात देखील बिबट्यांची दहशत वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी एक अनोखा मार्ग निवडला आहे, तो म्हणजे ते थेट बिबट्याचा वेष परिधान करून विधानभवनात दाखल झाले आहेत.

आमदारांच्या या पेहरावाने नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले आहे. सोनवणे यांनी विधानभवनात प्रवेश करताच उपस्थितांचे लक्ष वेधले आणि त्यांनी बिबट्यांच्या हल्ल्यांविषयी सरकारला तातडीने कठोर निर्णय घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते बिबट्यांची संख्या अनियंत्रित वाढत असून सरकारने केवळ उपाययोजनांवर चर्चा न करता प्रत्यक्ष कारवाई सुरू करणे आवश्यक आहे.

आमदार शरद सोनवणे यांनी विधानभवनात सांगितलं की, राज्यात तब्बल 9 ते 10 हजार बिबट्यांची संख्या असल्याचा त्यांचा दावा आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत 55 जणांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले. नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी सरकार महिलांना, मुलांना आणि शेतकऱ्यांना लोखंडी पट्टा घालण्याचा सल्ला देते, अशी टीकाही त्यांनी केली. अनेक भागांत लहान मुले शाळेत जाण्यास घाबरतात, तर नागरिक घराजवळसुद्धा सुरक्षितपणे फिरू शकत नाहीत, असे गंभीर वास्तव त्यांनी मांडले.

blank