
गोंदिया : जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना लगाम लावत स्थानिक गुन्हे शाखेने १२ डिसेंबर रोजी मोठी कारवाई करीत आंतरराज्यीय टोळीतील दोन चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून १६ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईनंतर जिल्ह्यात चोरीला गेलेल्या अनेक वाहनांचे धागेदोरे गवसण्याची शक्यता आहे.
देवेंद्र हिरामण रुखमोडे (४०) रा. मुरदोली यांनी ७ ते ९ डिसेंबर दरम्यान घरासमोर ठेवलेली काळ्या रंगाची मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशन गोरेगाव येथे केली. याप्रकरणात कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केल्यानंतर १२ डिसेंबर रोजी गोपनीय माहिती काढून गोंदियातील दोन युवकांकडे चोरीच्या मोटारसायकल पकडल्या. ते आंतरराज्यीय टोळीशी संबंधित आहेत, अशी माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
आरोपी योगेश राजकुमार मुरादवानी (४०) रा. श्रीनगर, गोंदिया व विलास घनश्याम मानकर (२३) रा. गौतमनगर, गोंदिया या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात, पोलिस हवालदार राजू मिश्रा, पोलिस हवालदार सुबोध बिसेन, संजय चव्हाण, राजकुमार खोटेले, दीक्षित दमाहे, सुजित हलमारे, इंद्रजीत बिसेन, भोजराज बहेकार, पोलिस शिपाई राकेश इंदुरकर, छगन विठ्ठले, संतोष केदार, दुर्गेश पाटील, कुंभलवार, राम खंदारे यांनी केली आहे.
जळगाव ते दुर्गपर्यंत चोरीचे सत्र
चौकशीत आरोपींनी गोंदिया, भंडारा, नागपूर, बालाघाट, राजनांदगाव, रायपूर आणि दुर्ग या सात जिल्ह्यांतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली वाहने त्यांनी गोंदियातील घरांमध्ये लपवून ठेवली होती. काही वाहनांवर बनावट नंबरप्लेट बसवलेल्या होत्या, तर काही वाहनांवर नंबरप्लेटच नव्हत्या.





