
अर्जुनी-मोर. -महागाव येथे तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात जिल्हा परिषद हायस्कूल बोंडगाव देवी येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुकास्तरावर शाळेचा नावलौकिक वाढवला.
इयत्ता ६ ते ८ कबड्डी गटातील मुलांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच ६ ते ८ खो-खो गटातील मुलींनीही प्रथम क्रमांक मिळवून विजयाचा मान मिळवला.वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडी स्पर्धेत भावेश बोरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आयुषी मौर्य हिने प्रथम क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम राखली.
सांस्कृतिक स्पर्धांमध्येही शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रमात ६ ते ८ गटातील मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला, तर ९ ते १२ गटातील मुलींनी सामूहिक सांस्कृतिक नृत्यात प्रथम क्रमांक पटकावून उपस्थितांची मने जिंकली.एकेरी नृत्य स्पर्धेत शिवानी खोटेले हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर चेस स्पर्धेत रितेश मेश्राम याने प्रथम क्रमांक पटकावत बुद्धिबळातील कौशल्य सिद्ध केले.
या सर्व यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून,जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सदस्य कुंदा लोगडे,संदिप कापगते,मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालकवर्ग व शाळा व्यवस्थापन समीती तथा ग्रामवासियांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे जिल्हा परिषद हायस्कूल बोंडगाव देवी ची तालुकास्तरावर मान उंचावली असून भविष्यातही अशीच यशाची घोडदौड सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





