33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home यशोगाथा गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार जलसंधारणातून शाश्वत शेतीकडे वळूया 

गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार जलसंधारणातून शाश्वत शेतीकडे वळूया 

0
32

blank

वारंवार जाणवणारी पाणीटंचाई, कमी होत जाणारी भूजल पातळी आणि शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेता शासनाने गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून धरणे, तलाव, बंधारे व इतर जलसाठ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून जलसाठ्यांची साठवण क्षमता वाढविणे आणि तोच सुपीक गाळ शेतजमिनीत वापरून शेतीची उत्पादकता वाढविण्याचा दुहेरी उद्देश साध्य करण्यात येणार आहे.
या अभियानामुळे जलसाठ्यांतील गाळ काढून टाकल्याने पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवणे शक्य होऊ शकेल. परिणामी धरणांची पाणी साठवण क्षमता वाढून सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्धता सुधारण्यासाठी मदत होणार आहे. सुपीक गाळ शेत शिवारात टाकण्यात येत असल्याने जमिनीची पोत सुधारून, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते आणि उत्पादनक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन शाश्वत शेतीला चालना मिळणार आहे.
“गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार” हे अभियान लोकसहभागावर आधारित असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. जिल्हा प्रशासन, जलसंधारण विभाग, ग्रामपंचायती, शेतकरी, स्वयंसेवी संस्था व यंत्रणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. लोकसहभागातून कामे झाल्याने शासनाचा खर्च कमी होतो तसेच कामांची गती आणि गुणवत्ता वाढेल. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत जलसाठे गाळमुक्त करण्यासाठी सहकार्य करत आहे.
या अभियानामुळे केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने दुबार पिके घेणे शक्य होत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तसेच भूजल पातळी उंचावल्याने विहिरी, बोअरवेल यांना दीर्घकाळ पाणी उपलब्ध राहु शकते. पर्यावरणीय समतोल राखत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
एकूणच “गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार” हे अभियान जलसंधारण, शेती विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम साधणारे आहे. पाणी म्हणजे जीवन हे सूत्र प्रत्यक्षात उतरवत, भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
गाळमुक्तधरण – गाळयुक्त शिवार हे अभियान जिल्ह्यातील जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. जलसाठ्यांमधील साचलेला गाळ काढल्यामुळे धरणांची साठवण क्षमता लक्षणीयरीत्या वाढत असून पावसाचे पाणी अधिक प्रमाणात अडविणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर हा सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शिवारात वापरल्याने जमिनीची गुणवत्ता सुधारून शेती उत्पादनात वाढ होऊ शकते. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा, ग्रामपंचायती आणि शेतकरी यांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबविले जात आहे. लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाची कामे पूर्ण करून दुष्काळमुक्त व समृद्ध जिल्हा घडविण्याचा आमचा संकल्प आहे.
_जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवानी 
संकलन:_अनिल कुरकुटे जिल्हा माहिती कार्यालय वाशिम