31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश आपत्तीचा सामना करण्यासाठी 8 हजार 858 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

आपत्तीचा सामना करण्यासाठी 8 हजार 858 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

0
21
परभणी, दि. 31 –परभणी जिल्ह्यात आपत्तीपूर्व तयारी व आपत्तीच्या वेळी योग्य प्रतिसाद देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या सहकार्याने फेमेक्स (Familiarisation Exercise) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात व्यापक स्वरूपात शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
सदर फेमेक्स प्रशिक्षण कार्यक्रमाचा जिल्ह्यातील एकूण 8 हजार 858 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत योग्य व वेळेत निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यास हातभार लागणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम एनडीआरएफ, पुणे येथील टीम कमांडर राम जनम यादव यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, गंगाखेड, मानवत, पाथरी, सोनपेठ, सेलू, जिंतूर व परभणी तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना भूकंप, आग, पूर, वीज आपत्ती, आपत्कालीन स्थलांतर, प्राथमिक सुरक्षितता उपाययोजना, आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी तसेच आपत्तीनंतरची कृती याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा प्रशासन, परभणी यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचे सूक्ष्म नियोजन व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सविता बिर्गे व जिल्हाआपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, उपशिक्षणाधिकारी श्री. मोरे व सर्व संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी काम पाहिले.