अर्जुनी-मोर —क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी माहुरकुडा येथे ‘संयुक्त भारत युवा बचत गट’च्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावातील रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे होणारे अपघात आणि याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, तरुणांनी स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून हे अभियान यशस्वीपणे पार पाडले.
अपघातांना आळा घालण्यासाठी पुढाकार
डोंगरे मोहल्ला ते विसावा (सिरोली–महागाव मार्ग) या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा, पालापाचोळा व घाण साचली होती. यामुळे वाहनचालकांना अडथळे निर्माण होत असून अनेक लहान-मोठे अपघात घडत होते. या संदर्भात बचत गटाने प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली; मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर जयंतीचे निमित्त साधून युवकांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला.
श्रमदानातून गावकरी एकवटले
आज सकाळी बचत गटाचे सर्व सदस्य फावडे, कुदळ, पाट्या घेऊन रस्त्यावर उतरले. डोंगरे मोहल्ल्यापासून अभियानाला सुरुवात करून विसावा (सिरोली–अर्जुनी मोरगाव मुख्य रस्ता) पर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे रस्ते चकाचक झाले असून अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी माहुरकुडा ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मीकांत नाकाडे यांनी उपस्थित राहून युवकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
या स्वच्छता अभियानात संयुक्त भारत युवा बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये गटाचे अध्यक्ष अजय शहारे, उपाध्यक्ष मोडकु राऊत, सचिव धीरज मेश्राम, सहसचिव कुमार अक्षय बडोले, कोषाध्यक्ष पुरुषार्थ नेवारे यांच्यासह संजीव लोणारे, तुलाराम मेश्राम, लोकेश टेंभुर्णे, महेश भैसारे, कुमार विश्वास शेंडे, कुमार महेश कुरंजेकार, गुरुदेव करंजेकार, कैलास गुप्ता, संजय शहारे, कुमार मनीष डोंगरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
“केवळ जयंती साजरी न करता समाजोपयोगी कार्यातून सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन करायचे, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे,” अशी भावना यावेळी गटाच्या सदस्यांनी व्यक्त केली.





