
गोंदिया,दि.०८ः : गोंदिया पोलीस विभागाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत अतिदुर्गम भागातील युवक-युवतींसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून त्यातंर्गतच ७ जानेवारी रोजी पोलीस मुख्यालय कारंजा येथे सशस्त्र दूरक्षेत्र बीजेपार व बोंडे या अतिदुर्गम भागातील १२ युवक-युवतींना अहिल्यानगर येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले.पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणार्थींना वेल्डिंग व सीएनसी (CNC) मशिन ऑपरेटर या अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणाकरीता निवड करण्यात आली आहे.त्याना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत मिळणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, अहिल्यानगर यांच्या माध्यमातून संबंधित प्रशिक्षणार्थींना नोकरीची शंभर टक्के हमी देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस मोठा हातभार लागणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते तसेच नक्षल प्रोपागंडा सेलचे अंमलदार भास्कर हरिनखेडे यांनी केले.या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले असून अशा उपक्रमांमुळे युवकांचा मुख्य प्रवाहात सहभाग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





