
गोंदिया,दि.13: गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी हंगामात ऊर्जे विषयक समस्येचा सामना करावा लागणार नाही, अशी ग्वाही ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे दिली. देवरी- चिचगड भागातील 132 / 33 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन समारंभाच्या प्रसंगी श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके, आमगाव देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, नगराध्यक्ष संजय उके, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. तसेच आयटीआयचे विद्यार्थी परिसरातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
श्रीमती बोर्डीकर पुढे म्हणाल्या, स्थानिक शेतकरी बांधवांना 24 तास वीज मिळावी, विद्यार्थ्यांनाही याचा लाभ व्हावा, यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून आज या उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रत्यक्षात यावा, यासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.राज्य शासनाने मुख्यमंत्री कृषी वाहिनी ही योजना सुरू केली असून या अंतर्गत सौर ऊर्जा पंप लावण्यात येत आहेत.या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा. मागेल त्याला सौर पंप 120 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर 120 दिवसाच्या आत सौर ऊर्जा पंप देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उन्हाळ्यात ट्रान्समिशन बिघाड होण्याचे प्रमाण जास्त असून हे ट्रान्समिशन 48 तासांच्या आत दुरुस्त करण्याची जबाबदारी वीज विभागाची असून त्यांनी ती वेळेच्या आत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी मंचावरून दिले.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी आदिवासी भाग असल्याने या ठिकाणी रोजगार च्या संधी कमी आहेत. तरी, अन्य ठिकाणी जाणारा इथेनॉलचा प्रकल्प हा देवरी या भागात आणून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. उन्हाळ्यात विजेची समस्या निर्माण होत असल्याने आज भूमिपूजन झालेल्या उपकेंद्रातून काही प्रमाणात का होईना येत्या काळात समस्या सुटतील, असे श्री. परिणय फुके म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्तविक महापारेषणचे मुख्य अभियंता सतिश अणे यांनी केले.




