

गोंदिया, दि.१९ : गोंदिया स्टार्टअप आयडिया चॅलेंज 2025-26 चा पुरस्कार व सन्मान समारंभ आयबीएफसी गोंदिया, शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला उपस्थित होते. तसेच विशेष पाहुणे म्हणून शासकीय पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. सी.डी. गोळघाटे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सारंग पटले व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त आर.एन. माटे उपस्थित होते.हा समारंभ डॉ. शिवाजी श्रीराम धवाड, सीओओ, InFED IIM नागपूर याच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या स्पर्धेअंतर्गत गेल्या काही महिन्यापासून मार्गदर्शन, मूल्यमापन आणि सादरीकरणाची प्रक्रिया पार पडली. अंतिम फेरीत मोरिशच्या फाउंडर चहक पारधी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. क्लीन सिटी अॅप्लिकेशनचे फाउंडर अंकुश राणे व त्यांच्या टीमने द्वितीय क्रमांक, तर मेडिस्विफ्टचे फाउंडर राजीभाई दुबे व त्यांच्या टीमने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आयबीएफसी गोंदिया यांनी जिल्ह्यातील दोन नवउद्योजक स्टार्टअप्स सोबत इन्क्युबेशन सहाय्यासाठी करार केला. शाल्यम नवनीती (संस्थापक मयूर टेंभरे) आणि NSSKILLEDGE Pvt. Ltd. (संस्थापक कार्तिक मेंढे) या स्टार्टअप्सना मार्गदर्शन व संस्थात्मक सहाय्य दिले जाणार आहे.या उपक्रमातून गोंदिया जिल्ह्यातील स्टार्टअप संस्कृती अधिक मजबूत करण्याचा आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा आयबीएफसी गोंदियाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले




