
देवरी, ता. २० ः उचेपूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या धोबाटोला गावात अरमान बिअर बारविरोधात गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बारची तोडफोड केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी चिचगड पोलिसांनी ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील उचेपूर ग्रामपंचायतीअंतर्गत धोबाटोला गावात अरमान बिअर बारविरोधात गावकऱ्यांचे मागील ३ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. यात काही ग्रामस्थांकडून उपोषणही करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी उचेपूर ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिअर बार सुरू ठेवायचा की बंद करायचा? यासाठी हात उंचावून मतदान करण्यात येत होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या मतदानादरम्यान बारमालकाने ग्रामसभेत हस्तक्षेप केला.
हस्तक्षेप होत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी संतप्त होत आमची सही व मतदान प्रशासनिक अधिकारी घेत नसल्याचा ठपका ठेवत गोंधळ घातला. यानंतर थेट अरमान बिअर बारकडे मोर्चा वळवत बारमध्ये घुसून फर्निचरची तोडफोड केली. दारूच्या बाटल्या फोडल्या.
या प्रकरणी चिचगड पोलिसांनी ३० गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना अटक केली आहे. अटक केलल्या आरोपींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.
………………………





