
नागपूर : बारावीच्या पेपरफूट प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटकेतील एकूण आरोपींची संख्या आठ इतकी झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ कोचिंग क्लास संचालक नव्हे, तर आता कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक व महाविद्यालयाचा संचालकही पोलिसांच्या हाती लागले आहेत. सद्यस्थितीतील चौकशीच्या स्थितीनुसार जयताळा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील संचालकाने पेपर फॉरवर्ड केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रूजलेली असून, अनेक कोचिंग क्लासेस व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उत्तरांसह
फॉरवर्ड झाली होती. जयताळा येथील विद्यासाधना शाळेचे संचालक संदीप बाबूराव सरटकर (४६, जयताळा), विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप भय्यालाल जांगडे (४३, आराधना कॉलनी, नारा मार्ग), एज्युकेशन अकॅडमी या कोचिंग क्लासचा संचालक मनीष शंभरकर (४६, गोदाम ले आऊट, त्रिमूर्तीनगर) व दिनेश कोटांगळे (३७, कबीरनगर, नारी मार्ग) अशी अटकेतील आणखी आरोपींची नावे आहेत.
सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थिनीच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच रसायनशास्त्राचा पेपर आलेला होता. त्याच ग्रुपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली होती. विद्यार्थिनींच्या मोबाइलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेला भौतिकशास्त्राचाही पेपर सापडला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल दहिफळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पेपर फोडणान्यावर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी निशिकांत मूल (४५, मानकापूर) व फरहान अख्तर (१९, कामगारनगर), एक्सेलेन्ट अकॅडमीचा संचालक मुस्तफा खान मुनीर खान (४२,भानखेडा) व जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद (२४, हसनबाग) यांना अटक केली होती. मुस्तफा व जुनेद यांना दिनेश कोटांगळे (३७, कबीरनगर, नारी मार्ग) याने व्हॉट्सअॅपद्वारे रसायनशास्त्र व गणिताचा पेपर फॉरवर्ड केल्याचे तांत्रिक चौकशीतून समोर आले. सर्व आरोर्पीना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुख्याध्यापकाने दिली रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका
कोटांगळेला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. कोटांगळेला त्याचा परिचयाचा आरोपी अल्ताफ गोडिल याने बारावीचा पेपर परीक्षेअगोदर मिळू शकतो का, अशी विचारणा केली होती. दिनेशने सुरज सहारे नावाच्या व्यक्तीला फोन केला असता त्याने मनीष शंभरकर याच्या मार्फत प्रदीप जांगडेला भेटायला सांगितले.
दिनेश व अल्ताफ हे प्रदीप जांगडेला भेटले. प्रदीपने दिनेशला रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका व उत्तरे दिली. दिनेशने ते अल्ताफला व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले, २१ फेब्रुवारी रोजी गणिताचा पेपर होता. तोदेखील जांगडे व दिनेशने अल्ताफ व मुस्तफा मुनीर यांच्या मोबाइलवर पाठविला होता.





