गोरेगाव ,दि.१५- तालुक्यातील पालेवाडा येथील पुंडलिक डोये या शेतकऱ्याचे एकत्रीकरणापुर्वीच्या जुन्या सातबारात गट क्र. ३३६ मध्ये १०.१४ हेक्टर आर शेतजमीन होती. मात्र सन १९७०-७१ मध्ये झालेल्या एकत्रीकरणानंतर गट बदलमधील सातबारात चक्क १.६२ हेक्टर आर जमीन कमी दाखविण्यात आली. शेतकरी पुंडलिक डोये यांच्या निधनानंतर त्याचे कुटूंब ही जमिन गेली कुठे? असा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षापासून महसूल विभागाकडे फिर्याद नोंदवून सदर जमिनीचा सातबारा तयार करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, कोणताही अधिकारी किंबहुना प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून पिडित शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला न्याय केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
सविस्तर असे की, पालेवाडा येथील कृष्णकुमार पुंडलिक डोये याच्या वडिलाच्या नावे असलेल्या गट क्र. ३३६ च्या सातबारावर १०. १४ आर शेजजमिन होती. मात्र सन १९७१ मध्ये झालेल्या एकत्रीकरणातून नव्या गट क्रमांकाच्या ४१७ मध्ये फक्त ८.५२ हेक्टर आर शेजमिनीचा सातबारा तयार करण्यात आला. त्यामुळे १.६२ हेक्टर आर शेत जमीन गेली कुठे? असा प्रश्न कृष्णकुमार डोये यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. या संदर्भात कृष्णकुमार डोये यांनी संबधित विभागाकडून इतभूत कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्यामुळे जुन्या सातबारा व नव्या सातबारातील नोंद जमिनीचा तफावत समोर आली. त्या अनुसंगाने कृष्णकुमार डोये यांनी गेल्या दोन वर्षापासून महसूल विभागाकडे जमिनीचा शोध घेण्याच्या अनुसंगाने धडपड सुरू केली. तर तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व त्यापुढे जावून उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत त्याची धडपड सुरू झाली. मात्र दोन वर्षाचा काळ लोटूनही पिडीत भुमिहीन झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे दोन वर्षापासून कार्यालयांचे उंबरठे झिजवित असलेला शेतकरी पर्यायाने वेगळी भुमिकेत असल्याचा व्यक्त करू लागला आहे.
ती जमिन हयात मात्र दुसऱ्याच्या ताब्यात
पालेवाडा येथील पुंडलिक व तेजराम डोये या दोन्ही भावांमध्ये शेतजमिनीचा हिस्सा वाटा झाला. दरम्यान पुंडलिक डोये यांच्या हिस्स्यात १०.१४ हेक्टर आर जमीन आली. मात्र एकत्रीकरणाच्या सातबारात १०.१४ हेक्टर जमिन ८. ५२ हेक्टर एवढीच राहिली. दरम्यानच्या काळात कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुंडलिक याने सदर जमिन विक्री केली. मात्र त्यातच त्याचा मृत्यू झाला. संज्ञान झालेल्या पुंडलिकचा मुलगा कृष्णकुमार याने जमिनीचा शोध घेतला असता सातबारावर कमी असलेली जमिन कुटूंबातील तेजराम डोये व अमित डोये यांच्या ताब्यात आहे. ताब्यातील जमिन त्या शेतकऱ्याच्या सातबारावर नाही. मात्र प्रत्यक्षात शेतजमीन असतानाही यंत्रणेच्या चुकीमुळे आपल्या मालकी हक्काच्या जमिनीपासून वंचित राहत असल्याचा आरोप पुंडलिक खोब्रागडे यांनी केला आहे. प्रशासनाने न्याय दिला नाही तर आगामी काळात कुटूंबासह आत्मदहन किंबहुना तीव्र आंदोलन करू, असा इशाराही कृष्णकुमार पुंडलिक डोये यांनी आयोजित पत्र परिषदेत दिला आहे.





