41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home महाराष्ट्र राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान

राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान

0
65

blank

नवी दिल्ली, दि. ९ : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष ‘रक्षा अलंकरण’ सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्यावतीने त्यांच्या पत्नी श्रीमती श्यामबाला जंजाळ आणि आई श्रीमती शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच अन्य केंद्रीय मंत्री, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

६ जुलै २०२४ रोजी काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान शिपाई प्रवीण जंजाळ आपल्या तुकडीसह कार्यरत होते. मोहिमेदरम्यान काही संशयास्पद हालचाली निदर्शनास येताच त्यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले. याचवेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पळून जाण्याच्या उद्देशाने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिपाई जंजाळ यांनी विलक्षण धैर्य, शौर्य आणि प्रसंगावधान दाखवत दहशतवाद्यांचा पाठलाग केला. स्वतःच्या अचूक गोळीबारातून त्यांनी दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीदरम्यान त्यांच्या डोक्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवला आणि अखेर मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करले.

त्यांच्या या अतुलनीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेसाठीच्या सर्वोच्च बलिदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ जाहीर केले होते.

blank

000000