सालेकसा :तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच एका आव्हानात्मक पूरग्रस्त परिस्थितीत सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत येत असलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर भजेपार येथील आरोग्य पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका गरोदर मातेला सुरक्षित स्थानी हलवण्यात यश आले आहे. आरोग्य विभागाच्या या उत्कृष्ट कामगिरीचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सालेकसा तालुक्यातील भजेपार आणि परिसरातील पूरग्रस्त भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क कठीण झाला होता. अशा परिस्थितीत गावातील एका गरोदर मातेची प्रकृती पाहता तिला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेणे अत्यंत गरजेचे होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ मदत कार्य सुरू केले.
आरोग्य पथकाची जीवाची बाजी
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत येणाऱ्या आयुष्यमान आरोग्य मंदिर भजेपार येथील वैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेविका कु. विद्या बहेकार आणि आशा स्वयंसेविका श्रीमती विनूताई खांडवाये यांनी पूरपरिस्थितीवर मात करत थेट पूरग्रस्त भागात प्रवेश केला. या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे गरोदर मातेला तिथून बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
”पूरग्रस्त परिस्थितीमुळे संपर्क तुटला असला, तरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासाठी माता आणि बाळाचा जीव वाचवणे हेच सर्वात मोठे कर्तव्य होते. योग्य वेळी आम्ही तिच्यापर्यंत पोहोचू शकलो याचे समाधान आहे.”
— डॉ. दिनेश कटरे (समुदाय आरोग्य अधिकारी)
’माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ संकल्पनेची प्रचिती
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, अगदी दुर्गम व पूरग्रस्त भागातही सुरक्षित आरोग्य सेवा पोहचावी हे माननीय आरोग्य मंत्री यांचे स्वप्न आहे. त्यांच्या याच ‘सर्वांसाठी आरोग्य सेवा’ आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम भजेपार येथील आरोग्य पथकाने करून दाखवले आहे.
परिसरातून कौतुकाचा वर्षाव
अत्यंत प्रतिकूल हवामान आणि पूरग्रस्त भागातील पाण्याचा धोका असतानाही भजेपार आरोग्य मंदिराच्या या टीमने दाखवलेले साहस आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आदर्शवत आहे. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे गरोदर मातेच्या कुटुंबीयांनी आरोग्य पथकाचे हात जोडून आभार मानले असून, संपूर्ण सालेकसा तालुक्यातून या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





