26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात ५ वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा पालकांचा आरोप

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात ५ वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा पालकांचा आरोप

0
57
​गडचिरोली: जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात एका ५ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन मोहन चेन्नूरी (रा. रगायपल्ली) असे मृत बालकाचे नाव असून, हसत-खेळत रुग्णालयात दाखल झालेल्या मुलाचा इंजेक्शन दिल्यानंतर काही क्षणांत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पालकांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिरासाठी सचिनची निवड झाली होती. त्यानिमित्त त्याला ५ जुलै रोजी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत त्याला हृदयविकार वगळता अन्य कोणताही गंभीर आजार नव्हता. त्यामुळे त्याला गडचिरोली पाठविण्याचे ठरले होते. दिवसभर सचिन इतर मुलांसोबत हसत-खेळत देखील होता आणि त्याची प्रकृती सामान्य होती. मात्र, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरील परिचारिकेने त्याला इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच बालकाने प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
“आमचा मुलगा सकाळपासून पूर्णपणे ठीक होता, पण इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याचे प्राण गेले. हे वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण असून, चुकीच्या इंजेक्शनमुळेच आमच्या मुलाचा मृत्यू झाला,” असा आक्रोश करत पालकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.