31.4 C
Gondiā
Monday, July 13, 2026
Home विदर्भ भीमनगर रेल्वे क्रॉसिंगवरून वाद; ROB उभारणीसाठी दोन दिवसांत अहवाल द्या

भीमनगर रेल्वे क्रॉसिंगवरून वाद; ROB उभारणीसाठी दोन दिवसांत अहवाल द्या

0
11

गोंदिया : भीमनगर रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित अंडरपासला स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकासह घटनास्थळी पाहणी केली. रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) उभारणीच्या शक्यतांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना दोन दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागपूर–रायपूर आणि गोंदिया–चंद्रपूर रेल्वेमार्गांच्या मधोमध असलेल्या आंबेडकर वॉर्ड, सिंगलटोली, भीमनगर, कुंभारे नगर आणि चंद्रशेखर वॉर्ड येथील नागरिकांनी अंडरपासऐवजी रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी मोर्चा, निवेदन आणि बेमुदत उपोषण सुरू असून नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या मते, यापूर्वी नागपूर–रायपूर मार्गावरील कमी उंचीच्या अंडरपासमुळे मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे शालेय बस, रुग्णवाहिका, ट्रक, जेसीबी, बोअरवेल यंत्रणा आणि वीज विभागाच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भीमनगर रेल्वे क्रॉसिंग हा सध्या मोठ्या वाहनांसाठी एकमेव पर्याय असून येथेही अंडरपास झाल्यास हजारो नागरिकांचे दळणवळण विस्कळीत होईल, असा दावा त्यांनी केला.

पाहणीदरम्यान नगराध्यक्ष सचिन शेंडे, नगरसेवक सुनील भालेराव, पंकज यादव, सुनील भरणे, स्नेहा गडपायले, सामाजिक कार्यकर्ते अमित भालेराव, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार समशेर पठाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदिप बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता मल्लिकार्जुनराव तसेच रेल्वे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

आमदार अग्रवाल यांनी प्रस्तावित अंडरपासच्या जागेची पाहणी करून रेल्वे ओव्हरब्रिज उभारणीसाठी उपलब्ध तांत्रिक पर्यायांचा आढावा घेतला. सर्वंकष सर्वेक्षण करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देत, अहवालानंतर उच्चस्तरीय बैठक घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले.