वडेगाव येथील विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन जागृती कार्यक्रम
चित्रा कापसे/तिरोडा- अंधश्रद्धा ही समाजाच्या प्रगतीतील मोठी अडचण असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीवर डोळसपणे विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक प्रा. डॉ. प्रकाश धोटे यांनी केले. “जगात कुठेही भूत नाही, तसेच जादूटोणा किंवा भानामतीच्या माध्यमातून कोणतीही अलौकिक शक्ती निर्माण करता येत नाही,” असे त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वडेगाव येथे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे होते.
यावेळी विद्यार्थ्यांना भूत, भानामती, जादू, जादूटोणा आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करून तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
यावेळी प्रा. डॉ. प्रकाश धोटे म्हणाले की, जादूटोण्याने काहीही करता आले असते तर भारत-पाकिस्तान सीमेवर सैनिकांच्या खर्चाऐवजी जादूगारांना तैनात करून युद्ध थांबवता आले असते. त्यामुळे अशा अंधश्रद्धांना बळी न पडता प्रत्येक गोष्टीची तर्क, प्रयोग आणि विज्ञानाच्या कसोटीवर पडताळणी करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे यांनीही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारसरणी आणि विवेकशीलतेचे महत्त्व पटवून दिले.यावेळी सुभाष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस. के. कटरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिता उपरीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.





