24.8 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home विदर्भ आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी भूखंड वाटप आणि साहित्याचे वितरण

आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी भूखंड वाटप आणि साहित्याचे वितरण

0
6
  • मान्यवरांच्या हस्ते १४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंडांचे वाटप

  • पुनर्वसन निधीच्या धनादेशांचे तसेच विविध साहित्याचे वितरण

  • मुलांना सायकली, शैक्षणिक साहित्य; तर प्रशिक्षणार्थ्यांना चारचाकी वाहन परवान्यांचे वाटप

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता अंतिम घटका मोजत असून, नागरिक माओवादाच्या भीतीपासून मुक्त होत आहेत. शासनाची आत्मसमर्पण योजना आणि हिंसाचाराला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी आजवर पोलिसांसमोर शस्त्रे खाली ठेवली आहेत. याच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता यावे, यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत आज (१ सप्टेंबर २०२६) भूखंड वाटप, पुनर्वसन निधी धनादेश आणि विविध साहित्यांच्या वितरणाचा विशेष कार्यक्रम पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी पुनर्वसन धोरणामुळे आजवर ८१९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शासनाच्या धोरणानुसार आत्मसमर्पितांना जमीन, घरकुल, रोजगार व आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात. जिल्हा प्रशासन व पोलीस दलाच्या समन्वयातून आतापर्यंत मंजूर १७४ भूखंडांपैकी १५३ भूखंडांचे वितरण आधीच झाले होते. उर्वरित १४ आत्मसमर्पितांना आज मान्यवरांच्या हस्ते भूखंडांचे अधिकृत वाटप करून प्रमाणपत्रे देण्यात आली.यावेळी केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या पुनर्वसन निधीचे धनादेश, आत्मसमर्पितांच्या मुलांना सायकली व शैक्षणिक साहित्य, तसेच चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सदस्यांना वाहन परवान्यांचे (ड्रायव्हिंग लायसन्स) वितरण करण्यात आले.blank

शासनाचे सहकार्य कायम राहील : जिल्हाधिकारी

कार्यक्रम प्रसंगी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आत्मसमर्पितांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “आत्मसमर्पितांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

हिंसाचार सोडून प्रगतीचा मार्ग निवडल्याबद्दल कौतुक : पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता व प्रगतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या आत्मसमर्पित सदस्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गडचिरोली पोलीस दल विविध उपक्रमांद्वारे शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., सहाय्यक जिल्हाधिकारी अजय डोके, आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनील उईके प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पो.उ.नि. नरेंद्र पिवाल, म.पो.उ.नि. प्रतीक्षा राठोड व पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.