देवरी, दि.४ सप्टेंबर :तालुक्यातील लोहारा गावालगत गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.गंभीर जखमींमध्ये कु. किर्तिका रमेश बागडे (वय १७, रा. परसटोला, देवरी),नरेश प्रल्हाद वासनिक(आमगाव-ननशरी),ललीत प्रेमकुमार पंधराम (वय २२, रा. आमगाव-ननशरी)देवानंद भत्कवर्ती (वय 30,आमगाव-ननशरी)यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रमांक MH 35 AW 7215 असलेले चारचाकी वाहन आमगावकडून देवरीच्या दिशेने येत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने येणान्या दुचाकीने चारचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दा झाली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिका, नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका तसेच पोलिसांना माहिती दिली. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चौघांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या भीषण अपघातामुळे लोहारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास देवरी पोलीस करित आहेत.





