24.1 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home गुन्हेवार्ता मॉडिफाय सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकींवर पोलिसांचा बडगा; ५ सायलेंट सायलेंसर नसलेल्या मोटारसायकली जप्त

मॉडिफाय सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकींवर पोलिसांचा बडगा; ५ सायलेंट सायलेंसर नसलेल्या मोटारसायकली जप्त

0
8

गोंदिया: शहर व परिसरात सायकल व दुचाकींना मॉडिफाय सायलेन्सर लावून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत गाड्या चालवणाऱ्या हुल्लडबाजांचे प्रमाण वाढले आहे. या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत गोंदिया पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखेने शुक्रवारी शहरात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली.

या कारवाई दरम्यान फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या मॉडिफाय सायलेन्सर बसवलेल्या ५ दुचाकी पकडण्यात आल्या असून, या सर्व गाड्या वाहतूक पोलीस ठाण्यात जमा (डिटेन) करण्यात आल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारे बेकायदेशीर सायलेन्सर लावून शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरुच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नागेश भास्कर, श्रेणी पोलीस निरीक्षक श्रावण गेडाम, छत्रपालसिंग चंदेल व वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

पोलीस प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी व वाहनचालकांनी आपल्या गाड्यांना कंपनीचे मूळ सायलेन्सरच वापरावेत. बेकायदेशीर बदल करून फटाक्यांसारखे आवाज काढणारे सायलेन्सर लावू नयेत. यामुळे रुग्ण आणि बालकांना नाहक त्रास होतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही वाहने जप्त करण्याची कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.