बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेचे लोकार्पण

0
10

चंद्रपूर दि. 10: मानवाने स्वत:सोबतच जगाचा विचार केला पाहिजे ही भावना बाबा आमटे यांनी रुजविली. आपल्या आयुष्यात अखंडपणो त्यांनी दु:खीतांची सेवा केली. त्यांच्याच विचाराला पुढे नेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेतील विद्यार्थी जिल्ह्याचे नाव मोठे करतील, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतिनिमित्त बांधण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, आमदार नानाजी शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, बांधकामचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणो, मनोज जयस्वाल, नगरसेवक राहुल पावडे, देवानंद वाढई, अंजली घोटेकर आदी उपस्थित होते.

बाबा आमटे यांच्यावर काढण्यात आलेल्या डाक तिकिटाच्या विमोचन प्रसंगी बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ अद्ययावत अभ्यासिका उभारण्याचा मनोदय पालकमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्याप्रमाणो अभ्यासिकेचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. बाबांनी आपल्या शिकवणूकीतून पवित्र वातावरण निर्माण केले. त्यांची तिसरी व चौथी पिढीही दु:खीतांच्या सेवेत आहे. ही अद्वितीय बाब असून बाबांच्या शिकवणीतून हे घडले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी डॉ. विकास आमटे यांचेही भाषण झाले. कुष्ठरोग्यांच्या मुलांना शिकता आले पाहिजे, अशी बाबांची भावना होती. अशा दु:खीत कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही या अभ्यासिकेचा लाभ होईल. यासारखेच अभ्यासिकेचे एखादे केंद्र आनंदवनात केले तर त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे डॉ. आमटे म्हणाले. आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार यांचीही यावेळी भाषणो झालीत. सुरुवातीस पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी फित कापून अभ्यासिकेचा शुभारंभ केला. तसेच तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. २ कोटी ६५ लाख रुपये खर्च करून सदर अभ्यासिका बांधण्यात आली आहे. अभ्यासिकेच्या तळमजल्यावर ३८ संगणक क्षमता असलेली ई लायब्ररी, २0 हजार पुस्तकांची क्षमता असलेल्या बुक रॅक्स व प्रसाधन गृहे तसेच पहिल्या मजल्यावर १५0 विद्यार्थी क्षमतेचा अभ्यासिका हॉल व प्रसाधन गृहे आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे यांनी केले. तर आभार कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणो यांनी मानले. संचालन ऐश्‍वर्या भालेराव यांनी केले.