मुंबई,दि.24-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सोमवारी मंजुरी दिली. हा निधी प्राप्त झाल्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यात जलदगतीने पैसे वर्ग करणे विभागास शक्य होणार आहे.
सुमारे ८८ लाख वहित थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारवर सुमारे ३४ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. कर्जमाफीमुळे सर्वच खात्याच्या वार्षिक तरतुदींना किमान २५ ते ३० टक्के कपात करावी लागणार आहे. मागच्या आठवड्यात सामाजिक न्याय खात्याच्या वार्षिक योजनेतील ५०० कोटींचा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वळवण्यात आला होता. तर १२ आॅक्टोबर रोजी आदिवासी विभागाच्या वार्षिक योजनेतील ५०० कोटीचा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आदिवासी विभागाकडून प्राप्त झालेल्या ५०० कोटीच्या निधीच्या खर्चास साेमवारी सहकार खात्याने मंजुरी दिली. दिवाळीपूर्वी सहकार खात्याने कर्जमाफ केलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. आता दिवाळीनंतर पुढच्या टप्प्यातील कर्जमाफ केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर लगेचचत्यांच्या बँक कर्ज खात्यात रकमा जमा करण्यात येणार आहेत.




