32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News अस्वलाच्या हल्यात एक ठार तीन गंभीर जखमी

अस्वलाच्या हल्यात एक ठार तीन गंभीर जखमी

0
22

इटखेडा येथील घटना जखमींना नागपूरला हलविले

अर्जुनी मोरगाव,(संतोष रोकडे)दि.०६ः- तालुक्यातील इटखेडा (इसापूर) शेतशिवारात अस्वलाच्या कळपाने अचानक हल्ला केल्याने एक ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी सकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान घडली असून यात केशव नारायण झिलपे (५५) हे ठार झाले असून तीन गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये महादेव ढिगु लोणारे (५०), शंकर तुकाराम भागाडकर (५०), निलेश शंकर भागाडकर (२४) यांचा समावेश आहे. सर्व तिन्ही गंभीर जखमींना ७ वाजता नागपूरला हलविण्यात आले आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संभाजीनगर इटखेडा/इसापूर या शेतशिवारात गेल्या महिन्याभरापासून वन्य प्राण्यांनी हैदोश घातला आहे. बिबट, रानडुकर, अस्वल तथा वानरांनी आपला मोर्चा आता गावाकडे वळविला आहे. पूर्वीच नागरिकांत भितीचे वातावरण असताना आज, ६ जानेवारीला सकाळी सहा ते साडेसहाचे दरम्यान शेतात काम करित असलेल्या नागरिकांवर तीन ते चार अस्वलाच्या कळपाने अचानक हल्ला केला. यामुळे शेतात काम करणारे व सकाळीच फिरायला जाणाºयांमध्ये एकच पळापळी सुरू झाली. मात्र, महादेव ढिगु लोणारे (५०), शंकर तुलाराम भागाडकर (५०), निलेश शंकर भागाडकर (२४), केशव नारायण झिलपे (५५) सर्व रा. इटखेडा यांचेवर अस्वलांनी हमला करून जबर जखमी केले. अस्वलांनी हल्ला केल्याची माहिती होताच अनेक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतल्याने अस्वलाचा कळप पळून गेला. गावकºयांनी चारही जखमींना १०८ च्या अ‍ॅम्बुलन्सनी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे आणले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. मात्र, गंभीर जखमीपैकी केशव नारायण झिलपे वाटेतच भंडाराजवळ मृत्यू पावले. घटनेची माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. तोपर्यंत सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलविण्यात आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयात इटखेडा/इसापूर येथील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी जखमींना नागपूरला हलविण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सची त्वरित व्यवस्था करा, यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांचे भोवती गराडा घातला. यावेळी अ‍ॅम्बुलन्स तब्बल दीड तास उशीरा आल्याने नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. या घटनेमुळे संभाजीनगर, इटखेडा/इसापूर या परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे वनविभाग व वन्यजीव विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.
तालुक्यात वन्यप्राण्यांचा वावर
१५ दिवसापूर्वी इटखेडा परिसरात अंजना नंदू बोळणे (५५) हि महिला शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला करून जखमी केले होते. तसेच संभाजीनगर येथील विठ्ठल कुंभलवार यांची एका बिबट्याने ठार केल्याचीही माहिती आहे.
वानरांचा हैदोस
इटखेडा/इसापूर, संभाजीनगर, वडेगाव रेल्वे या परिसरात जंगली वानरांचाही मोठाच हैदोस सुरू आहे. वानरांनी शेतशिवारासह आपला मोर्चा गावात वळविला आहे. गावखेड्यात कौलारु घरे असल्याने वानरांनी मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान केले असल्याची माहिती उद्धवराव मेहंदळे यांनी दिली तर शौचालयावरील पत्र्यांचीही मोठ्याप्रमाणात नुकसान झालेली आहे. वानरांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त झाले आहेत.