23.9 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home गुन्हेवार्ता पवनीत देहव्यापारासाठी मुलीची विक्री!

पवनीत देहव्यापारासाठी मुलीची विक्री!

0
26

पवनी,दि.27ः-पेढय़ात गुंगीचे औषध देऊन मुलीला पळवून नेऊन तिची देहव्यापाराकरिता विक्री करण्याचा डाव मुलीच्या प्रसंगावधानाने फसला. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्धपवनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नुजत खान (३५) व तिचा साथीदार आझाद खान (४0) रा. आंबेडकर चौक, पवनी अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी शनिवारी (ता.२४) दुपारी १२.३0 वाजता वैनगंगा विद्यालयासमोरून बाजाराकडे जात असताना नुजत खान या महिलेने तिला पेढे खायला दिले. मुलीने पेढा खाल्ल्यानंतर तिला चक्कर येऊ लागले. याचा फायदा घेत तिच्या सोबत असलेल्या आझाद खानने चारचाकी वाहनात बसवून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील खांबाडा या गावी नेले. त्यानंतर त्याने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी मुलीने त्यांच्या तावडीतून सुटका करून शेजारील घरात आसरा घेतला. त्या घरातील मुलींना आपबिती सांगून मदतीची विनंती केली. दरम्यान मदत करणार्‍या मुलींच्या वडिलांनी तात्काळ घेऊन येऊन पळविण्यात आलेल्या मुलीची विचारपूस करून पवनी तालुक्यातील तिच्या स्वगावी भ्रमणध्वनीवर माहिती दिली. तसेच भद्रावती पोलिस स्टेशनलाही तक्रार केली. मुलींच्या नातेवाईकांना माहिती मिळताच रविवारी (ता.२५) मुलीला सुखरूप पवनी येथे आणण्यात आले. सोमवारी (ता.२६) पवनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून महिलेला चौकशीकरिता पोलिस स्टेशनला आणण्यात आले.