मुंबई/कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पार्थिव कोल्हापूर विमानतळाहून दसरा चौकात आणण्यात आले आहे. येथे भावूक वातावरण असून शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहेच्या घोषणा दिल्या जात आहेत. कार्यकर्ते आणि पानसरे यांच्या विचारांवार श्रद्धा असलेले लोक मोठ्या संख्येने हजर आहेत. यात कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, कॉम्रेड, घरकामगार महिलांची संख्या मोठी आहे. बहुतेक कार्यकर्ते आणि महिला या लाल रंगाचे झेंडे घेऊन उभे आहेत.
दुपारी दिड ते दोन पर्यंत अंत्यदर्शन होईल त्यानंतर दोन वाजता अंत्ययात्रा निघेल आणि पंचगंगेच्या काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पानसरे यांचे शुक्रवारी रात्री 10.45 वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
शनिवारी सकाळी मुंबईत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर 10.30 वाजता एअर अॅम्ब्युलन्सद्वारे कोल्हापूरला आणले गेले. यावेळी मुंबई विमानतळावर शासनाचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर तासभर रखडल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.
कोल्हापूरमधील पंचगंगेच्या घाटावर दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) शनिवारी कोल्हापूर आणि रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून त्यात कोणताही बदल केला गेलेला नाही.
आज दुपारी कोल्हापूरमध्ये पानसरेे यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही सदस्य उपस्थित राहाणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एका मराठी वृत्तावाहिनीच्या वृत्तानुसार राज्य मंत्रिमंडळातील कोणीही पानसरेंच्या अंत्यविधीसाठी कोल्हापूराला जाणार नाही. पानसरेंवरील हल्ल्यानंतर पाच दिवसांनी त्यांचे निधन झाले आहे. अद्याप पर्यंत त्यांच्या मारेकर्यांचा सुगावा लागलेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रिमंडळातील कोणीही पानसरेंच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार नाही.
कोल्हापूरमध्ये शनिवारी भाकपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार होते. या अधिवेशनाचे कॉम्रेड पानसरे अध्यक्ष असणार होते. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी हल्ला झाल्यानंतरही अधिवेशन रद्द करण्यात आले नाही. आज त्याच अधिवेशनाचे त्यांच्या शोकसबेत रुपांतर होणार आहे. अधिवेशनासाठी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, पुणे येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले आहेत.
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
भाकपच्या अधिवेशनानिमीत्त राज्यभरातून कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आले आहेत. कॉम्रे़ड पानसरेंच्या निधनाची बातमी कळाल्यापासून कार्यकर्त्यांना भावना अनावर होत आहेत. कार्यकर्त्यांनी आजच महाराष्ट्र बंदची हाक देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाकप नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी रविवारी महाराष्ट्रात बंद पाळण्यात येईल असे सांगितले आहे.
आभाळ फाटले
आमच्या डोक्यावरचे आभाळ फाटले आहे. बोटबर चिंधीने आम्ही ते सांधू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन.डी.पाटील यांनी म्हटले आहे.
दाभोलकरांच्या हत्येला दिड वर्षे झाली तरी मारेकरी मोकाट आहे. तेव्हा आम्ही म्हणालो होते, सामाजिक समतेच्या लढ्यातील हे शेवटचे बलिदान आहे. दुर्दैवाने दिडवर्षात कॉम्रेड गोविंद पानसरेंसारखा योद्धा आम्ही गमावला. आता कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्याने राज्यात हे घडत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया एन.डी. पाटील यांनी व्यक्त केली होती.





